जिल्हा परिषद सदस्या धुपता मेहर यांच्या हस्ते सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : आदिवासी विकास विभागामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ चा शुभारंभ आज शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, खापा (खुर्द), ता. तुमसर येथे जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धुपता मेहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाच्या जनजागुतीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेवा चित्ररथा’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपक एम. हेडाऊ, सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) के. पी. बडगे, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) पी. बी. इंगोले, कार्यालयीन अध्यक्ष एस. जी. वैरागडे, मुख्याध्यापक महेश हातझाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष नुलताई मरसकोल्हे, सदस्य रमेश मरकाम, आदिवासी पालक घनश्याम उईके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा व सुविधांची माहिती पोहोचविणे तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अभियानाच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प शपथ, जनजागृतीपर उपक्रम आणि ‘सेवा चित्ररथा’दवारे विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
अभियानाच्या कालावधीत ‘सेवा चित्ररथ’ भंडारा जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांमध्ये भ्रमण करणार आहे. या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून आरोग्य, स्वच्छता आणि व्यसनमुक्तीबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून आदिवासी नागरिकांना आवश्यक शासकीय दाखले तसेच विविध योजनांचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड आणि अंतोदय कार्ड यांचा समावेश आहे. तसेच वनपट्टेधारक लाभार्थ्यांना ७/१२ उतारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
५ ऑक्टोबर २०२६ रोजी वीरांगना राणी दुर्गावती जयंतीनिमित्त आदिवासी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून पात्र आदिवासी महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या आर्थिक व सामाजिक सबलीकरणाला चालना देण्यात येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व, रंगोली आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘माझी शाळा, सेवा’ अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व वृक्षरोपणाचे उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांची विशेष मोफत आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे प्रभावी नियोजन व समन्वय करून आदिवासी भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना, सेवा व सुविधांचा लाभ पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा तसेच जिल्हा परिषद सदस्या श्रीमती धुपता मेहर यांनी यावेळी केले.