उल्हास तिरपुडे /भंडारा पत्रिका भंडारा : देशासह महाराष्ट्रात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने निर्माण होणाºया गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी रविवार दि. १६ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग स्किल परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील तब्बल १९ परीक्षा केंद्रांवर टायपिंग परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडचणी व विसंगती आल्याचा आरोप उमेदवारांनी केला असून, या परीक्षेमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याची भावना व्यक्त होत आहे. संपूर्ण परीक्षा रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी उमेदवारांकडून होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २०२६ मध्ये लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी तब्बल १ लाख १५ हजार ९२२ अर्ज प्राप्त झाले होते. लेखी परीक्षा पार पडल्यानंतर मेहनतीच्या जोरावर ११ हजार ६१७ उमेदवार टायपिंग स्किल टेस्टसाठी पात्र ठरले. त्यामुळे या उमेदवारांच्या आशा उंचावल्या होत्या. न्यायालयाशी संबंधित भरती प्रक्रिया असल्याने परीक्षा पार-दर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास उमेदवारांना होता. मात्र टायपिंग परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप होत असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.