भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कोथुर्णा, इंदुरखा, खैरी, लावेश्वर आणि खमाटा टाकळी या गावांमध्ये “पोस्टात खाते उघडा, त्यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील” अशी चर्चा पसरल्याने महिलांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून पोस्ट खाते उघडण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात पोस्ट विभागाचे अधिकारी श्री. भुरे यांच्याशी चर्चा केली असता, कोणावरही पोस्ट खाते उघडण्याची जबरदस्ती केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लाडकी बहीण योजना, पीएम किसान, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, कलाकार मानधन आदी योजनांसाठी संबंधित पर्याय (टिक) निवडून खाते उघडण्याची माहिती दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, परिसरात “लाडकी बहीणयोजनेसाठी पोस्ट खाते आवश्यक आहे” असा समज पसरल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या भात रोवणीची कामे सुरू असल्याने शेतकरी व महिला शेतीकामात व्यस्त असून अपुºया माहितीमुळे त्यांना विनाकारण धावपळ करावी लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश मोहतुरे यांनी सांगितले की, पोस्ट विभागाने याबाबत अधिकृत खुलासा करून नेमकी कोणत्या योजनांसाठी पोस्ट खाते आवश्यक आहे, कोणत्या योजनांसाठी ते ऐच्छिक आहे आणि नागरिकांना कोणती प्रक्रिया करावी लागेल, याची स्पष्ट माहिती जाहीर करावी. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी पोस्ट खाते अनिवार्य असल्याचा कोणताही शासन निर्णय असल्यास तो सार्वजनिक करावा; अन्यथा अशा अफवांबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन नागरिकांचा संभ्रम दूर करावा. पोस्ट खाते उघडणे आवश्यक असेल तर नक्कीच उघडू आणि पोस्ट विभागाला सहकार्य करू असेही उमेश मोहतुरे यांनी सांगितले. पण अफवा थांबवा. यासोबतच, नागरिक पोस्ट खाते उघडण्यास कमी प्रतिसाद देत असल्याने विविध योजनांच्या नावाखाली खाते उघडण्याबाबत गैरसमज निर्माण होत आहेत का, याबाबतही पोस्ट विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी उमेश मोहतुरे यांनी केली आहे.