रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीने गावराळा-मोहरणा रस्ता ठप्प

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी मोठी :- लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रातील लिलाव झालेल्या रेती घाटांमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे गावराळाझ्रमोहरणा मार्गाची अक्षरश: चाळण झाली असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवजड टिप्पर आणि ट्रकांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यात पावसाचे पाणी साचून संपूर्ण मार्ग चिखलमय बनला. परिणामी अनेक रेतीचे ट्रक रस्त्यातच अडकले असून, या मार्गावरील बससेवा मागील काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, लाखांदूर यांनी तातडीने रस्त्यावरील मोठे खड्डे मुरूम व खडी टाकून बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

मात्र, ग्रामस्थांच्या मते ही उपाययोजना तात्पुरती असून, ओव्हरलोड वाहतूक कायम राहिल्यास रस्ता पुन्हा काही दिवसांत पूर्ववत खराब होणार आहे. दरम्यान, लाखांदूरचे तहसीलदार यांनीही संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्येची गंभीरदखल घेत आरटीओ विभागामार्फत चौकशी व्हावी, यासाठी पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता आरटीओकडून ओव्हरलोड वाहतुकीवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, रेती घाटांमधून नियमबाह्य आणि क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी नियंत्रण ठेवले गेले नाही. वारंवार तक्रारी करूनही ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि अखेर प्रशासनाला दुरुस्तीची वेळ आली.

ग्रामस्थांनी रेती घाट मालकांना प्रशासनाकडून अप्रत्यक्ष पाठराखण मिळत असल्याचाही आरोप केला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग परिसरातील अनेक गावांचा प्रमुख दळणवळणाचा दुवा आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, शेतकरी, व्यापारी आणि रुग्णवाहिका याच मार्गावर अवलंबून आहेत. रस्ता वाहतुकीस अयोग्य झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतमाल वाहतुकीचा विलंब आणि आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही समस्या केवळ रस्त्यापुरती मर्यादित नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम करणारी ठरत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ओव्हरलोड वाहतुकीवर कायमस्वरूपी नियंत्रण, दोषींवर कठोर कारवाई, खराब झालेल्या रस्त्याचे दर्जेदार पुनर्बांधकाम आणि बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *