भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : रक्ताच्या नात्याची वीण किती घट्ट असते, याचा हृदय हेलावून टाकणारा प्रसंग मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे बुधवारी (२९) घडला. नातवाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर काही वेळातच आजोबांनाही हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचाही मृत्यू झाला. नितीन रमेश मते (४०) व रामचंद्र महादेव मते (७९) अशी मृत नातू व आजोबाचे नाव आहे. घरातून एकाच वेळी नातू आणि आजोबांची अंत्ययात्रा निघताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. पालोरा येथील नितीन मते यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. या घटनेने मते कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. नातवाच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे आजोबा रामचंद्र महादेव मते यांना हद्यविकाराचा झटका आला. यात त्यांचीही प्राणज्योत मालवली. या दुहेरी दु:खामुळे हळहळ व्यक्त करण्यात आले. नातवावर जिवापाड प्रेम करणाºया आजोबांना हा आघात सहन झाला नसल्याची भावना गावकºयांनी व्यक्त केली.
एकाचवेळी अंत्यसंस्कार
सायंकाळी पालोरा येथील स्मशानभूमीत आजोबा आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. गावातील अनेकांनी या प्रसंगाला मते कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वांत वेदनादायी क्षण असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी लोकप्रतिनधींसह, स्थानिक पदाधिकारी, नातेवाईक तथा ग्रामस्थ उपस्थित होते.