वेळ संपण्याआधीच अधिकारी-कर्मचारी गायब

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी (मोठी) / लाखांदूर : पंचायत समिती लाखांदूर येथे कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून अनुपस्थित असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विविध शासकीय कामांसाठी दूरदूरच्या गावांमधून आलेल्या नागरिकांना संबंधित अधिकारी व कर्मचारी आपल्या कक्षात उपलब्ध नसल्याने अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना काम न होताच परत जावे लागल्याची वेळ आली. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पंचायत समितीतील अनेक विभागांचे कक्ष रिकामे दिसून आले. काही ठिकाणी कर्मचारी नसल्याने कार्यालय अक्षरश: ओस पडल्याचे चित्र होते.

नागरिकांनी संबंधित कर्मचाºयांची चौकशी केली असता ते कार्यालयात उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. कार्यालयीन वेळ अद्याप शिल्लक असतानाच अधिकारी व कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे विविध दाखले, ग्रामपंचायतींशी संबंधित प्रस्ताव, विकासकामांच्या मंजुरी, शासकीय योजनांची कागदपत्रे, मनरेगा, पंचायत राज, सामाजिक सुरक्षा योजना तसेच इतर प्रशासकीय कामे रखडल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत, “वेळेवर कार्यालयात येण्याचे आणि कार्यालयीन वेळ संपेपर्यंत उपस्थित राहण्याचे नियम सामान्य नागरिकांसाठीच आहेत का?” असा सवाल उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिकांना पंचायत समिती कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासावर वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. मात्र, कार्यालयात अधिकारी व कर्मचारीच उपलब्ध नसल्याने नागरिकांची आर्थिक व मानसिक दोन्ही प्रकारे गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारामुळे शासकीय यंत्रणेवरील लोकांचा विश्वास कमी होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, त्या दिवशीच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीची नोंद (बायोमेट्रिक अथवा हजेरी रजिस्टर) तपासावी, कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे आणि विनाकारण अनुपस्थित राहणाºया अधिकारीकर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पंचायत समितीतील कामकाजाच्या शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *