सेंदूरवाफा टोलनाक्यावर पोलिसांची धडक कारवाई

१९९ किलो गांजासह ट्रक जप्त ; बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपी ताब्यात
१ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा गांजा

एसपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसरी मोठी कारवाई; राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थ तस्करीला पोलिसांचा मोठा दणका

नाजीम पाशाभाई
साकोली : ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकमधून तब्बल १९९.५६० किलो गांजा जप्त करून ₹१ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी साकोली पोलिसांनी केली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत बिहार व पश्चिम बंगालमधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात २४५ किलो गांजा जप्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत झालेली ही दुसरी मोठी कारवाई असून राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

साकोली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ६०६/२०२६ अन्वये कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) एनडीपीएस अॅक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक किशोर अरुण मानकर (वय ३६) असून त्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलीसांना २७ जुलैच्या पहाटे ओडिशा राज्यातून गांजाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक WB 23 F 8785) रायपूर–राजनांदगाव–देवरी–साकोली राष्ट्रीय महामार्ग मार्गे नागपूरकडे जात असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंदूरवाफा टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला.
पहाटे सुमारे २ ते ३ वाजताच्या दरम्यान संशयित ट्रक अडवून त्याची पंचांसमक्ष कायदेशीर तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला १९९.५६० किलो गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ₹९९ लाख ७८ हजार इतकी असून ट्रकची किंमत ₹३५ लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे एकूण ₹१ कोटी ३४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत ट्रक चालक पंकजकुमार भुषण यादव (वय ३०, रा. खुजहटिता, मांजी, जिल्हा छपरा, बिहार) तसेच क्लीनर बापी बादल मालीक (वय ३८, रा. नवग्राम, जमालपूर थाना, जिल्हा वर्धमान, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत करीत आहेत.
या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून अमली पदार्थांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.
विशेष म्हणजे, ३० जून २०२६ रोजीही साकोली पोलिसांनी मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या सहकार्याने सेंदूरवाफा टोलनाक्यावर मोठी कारवाई करून २४५ किलो गांजा जप्त केला होता. ओडिशाहून नागपूरकडे निघालेल्या आयशर ट्रकमधील कॅरेटच्या खाली अत्यंत चतुराईने लपवून ठेवलेला हा अमली पदार्थ पोलिसांनी शोधून काढला होता. त्या प्रकरणातही चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले होते. सलग दोन मोठ्या कारवायांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात साकोली पोलीस प्रभावीपणे काम करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी साकोली पोलीस सातत्याने गुप्त माहिती संकलन, नाकाबंदी व तपास मोहिमा राबवत आहेत. त्यामुळे तस्करांचे मोठे जाळे उद्ध्वस्त होण्यास मदत होत असून समाजाला घातक असलेल्या अमली पदार्थांच्या साखळीवर प्रभावी प्रहार होत आहे. वरिष्ठांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस करत असलेली ही कारवाई जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जितेंद्र राऊत, पोउपनि किशोर मानकर, पोउपनि अर्जुन बेडवाल, पोलीस हवालदार स्वप्नील गोस्वामी तसेच पोलीस अंमलदार नरेंद्र झलके, सचिन राऊत, टेकचंद बुरडे आणि धनविजय गणवीर यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या दक्षता, नियोजन आणि धाडसी कामगिरीमुळे आणखी एक मोठा अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *