भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून आतापर्यंत १६ हजार ९४१ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ राबविण्यात येत आहे.
या योजनेत १ एप्रिल २०२९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या पीक कर्जांना पात्रता देण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत व ३१ मार्च २०२६ रोजी अस्तित्वात असलेल्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजना (डळर) लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकºयांनी ३१ मार्च २०२७ पूर्वी दोन लाखांवरील थकबाकीची रक्कम बँकेत भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २३,६५५ आणि राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांची ६,९३९ अशी एकूण ३०,५९४ कर्जखात्यांची माहिती महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी प्राथमिक टप्प्यात २२ हजार ३६५ पात्र लाभार्थी निश्चित करण्यात आले असून त्यांना सुमारे १३७.१३ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येत असून ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्येही पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ३० जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १६,१५८ आणि राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांची ७८३ अशी एकूण १६,९४१ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सहकार विभागाचे अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा निरीक्षक, गटसचिव तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी स्पष्ट केले की, ई-केवायसी सेवा शेतकºयांसाठी पूर्णत: मोफत असून कोणत्याही सेवा केंद्राने शुल्क आकारल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रत्येक सेवा केंद्रावर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – ई-केवायसी सेवा शेतकºयांसाठी पूर्णत: विनामूल्य आहे” असा फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकºयांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा किंवा संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले.