ग्राम रोजगार सहाय्यकांच्या लढ्याला यश
♦ मंत्रालयातील बैठकीनंतर २४ सप्टेंबरला आदेश
♦ ३ ऑक्टोबर २०१४ चा शासन निर्णय कायम
भंडारा पत्रिका/ वार्ताहर
गोरा बपेडा : ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या १९ वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेला वादग्रस्त शासन निर्णय शासनाने २४ सप्टेंबर रोजी रद्द केला. मंत्रालयात २४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, ग्राम रोजगार सहाय्यकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्राम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शासन निर्णय क्रमांक मगंराारो-२०२४/प्र.क्र.६३/ रोहयो-१०, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा शासन निर्णय अधिक्रमित करण्याचा आदेश जारी करण्यात आला. अवर सचिव कैलास साळूंके यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. प्रशासकीय कारणास्तव २२ सप्टेंबरचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून, सुधारित निर्णय यथावकाश निर्गमित करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
३ ऑक्टोबर २०१४ चा शासन निर्णय कायम
२२ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द झाल्यामुळे आता ३ ऑक्टोबर २०१४ रोजीचा शासन निर्णय (मगरारो-२०२४/प्र.क्र.५१/ रोहयो-०८) पूर्ववत लागू राहणार आहे. त्यामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांच्या नेमणुका, सेवा व मानधनासंदर्भातील पूर्वीच्या तरतुदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्राम रोजगार सहाय्यक २००७ पासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करीत आहेत. २२ सप्टेंबरच्या निर्णयामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांच्या सेवा शर्तीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे.
एकजुटीच्या लढ्याला यश
याबाबत तालुका अध्यक्ष वसंत वाडीभस्मे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘२२ सप्टेंबरच्या निर्णयामुळे हजारो ग्राम रोजगार सहाय्यकांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शासनाने हा निर्णय रद्द केल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या १९ वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढा देत होतो. आजच्या निर्णयामुळे या लढ्याला यश मिळाले आहे.’
तालुका सचिव निकलेश गर्जभिये म्हणाले, ‘आमच्या मागणीला यश मिळाले आहे. ३ ऑक्टोबर २०१४ चा शासन निर्णय कायम राहणार असल्याची स्पष्टता बैठकीत झाली आहे, त्यामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांच्या सेवा शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही. तुमसर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी एकजुटीने सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय होणे हा आमच्यासाठी मोठा विजय आहे.’
तालुका कार्याध्यक्ष संजय ठाकरे यांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर २४ सप्टेंबर रोजी रद्द आदेश जारी करण्यात आला. हा निर्णय ग्राम रोजगार सहाय्यकांच्या एकतेचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम आहे.’
या बैठकीच्या वेळी तुमसर तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राम रोजगार सहाय्यकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.