अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रप्रेम – प्रा. राहुल डोंगरे

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा, प्रत्येक घटनेची चिकित्सा करण्याचे आवाहन :: शासकीय मुलींच्या आदिवासी वसतिगृहात अंधश्रद्धा निर्मूलनावरील प्रेरणादायी मार्गदर्शन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जादूतोणा, भूत-बानामती, तंत्रमंत्र, चटूक, देवी अंगत येणे, ज्योतिषप्रत्राच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि बुवाबाजी यांसारख्या अंधश्रद्धांना सुशिक्षित व्यक्तीही अनेकदा बळी पडतात. अंधश्रद्धेतून समाजात गैरसमज, भीती, भेदभाव आणि हिंसक घटना घडण्याची शक्यता असते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, प्रत्येक घटनेची चिकित्सा करणे आणि विवेकवादी विचारचा प्रसार करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रप्रेम असून, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक तथा प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.

शासकीय मुलींच्या आदिवासी वसतिगृहात आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल वैशाली सोमकुवर होत्या, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर सचिव विजय केवट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य राहुल डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात शकुन-अपशकुन, नवस, गंडेदोरे, ताईत, ग्रहांचे खडे आणि मंत्रतंत्र याविषयीच्या अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला. कोणत्याही दाव्याची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवून नये. प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, पुरावे तपासणे आणि तर्काच्या आधाराने निष्कर्ष काढणे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत, असे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक प्रयोगातून अंधश्रद्धेचे वास्तव उलगडले… केवळ भाषणातून नव्हे, तर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केला. अग्नी प्रज्वलित करणे, कानाने चित्रोरील नावे वाचल्याचा भास निर्माण करणारे प्रयोग, जळता कपूर हाताळण्याचे प्रात्यक्षिक, लिंबातून केस काढणे आणि तांदूळ भरलेले तांबे उचलणे अशा प्रयोगांच्या माध्यमातून तथाकथित चमत्कारांमधील शक्यता व युक्त्या समझावून सांगण्यात आल्या. प्रात्यक्षिकांमुळे उपस्थित विद्यार्थीनींमध्ये कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जादूतोणाविरोधी कायद्याची माहिती देत अंधश्रद्धांच्या नावाखाली होणाऱ्या शोषणविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन केले. स्वतः विवेकवादी बनण्याबरोबरच कुटुंबat, गावात आणि समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संवाद साधावा, गैरसमज दूर करावेत आणि इतरांचे समुपदेशन करावे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थिनींनी कोणत्याही चमत्काराला किंवा दाव्याला सहզपणे बळी न पडता त्यामागील सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. विज्ञाननिष्ठ विचार, मानवता आणि विवेक यांच्या आधारावरच समाजाची प्रगती साधता येते. अंधश्रद्धमुक्त समाजनिर्मिती ही केवळ एका संघटनेची नव्हे, तर प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी आहे, असा प्रेरणादायी संदेश प्राचार्य राहुल डोंगरे यांनी दिला.

कार्यक्रम प्रास्ताविक विजय केवट यांनी केले. संचालन कु. रवीना मडकाम यांनी, तर आभार प्रदर्शन कु. पायल उईके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगला मरसकोल्हे, सौ. प्रमिला रामटेके, प्रदीप रामटेके आणि मनीषा मरसकोल्हे, कुंदा उईके यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *