उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : १४ ऑक्टोबर १९५६ साली जगाच्या इतिहासातील सोनेरी पान असून नागपूरच्या दीक्षाभूमीवर महामानवाने धम्माचे चक्र फिरवले आणि लाखो लोकांच्या अंधारलेल्या आयुष्यात सूर्य उगवला. तो दिवस म्हणजे केवळ धर्मांतर नव्हे, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याची मिळालेली नवी ओळख आहे.
१४ ऑक्टोबर १९५६… नागपूरच्या धूळ-मातीत लाखो अनुयायांनी एकच गर्जना दिली, “बुद्धं शरणं गच्छामि”! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका इशाऱ्यावर हजारो वर्षांच्या अंधाराला चिरत धम्मचक्र वेगाने फिरले. त्या एका क्षणाने मुक्यांना वाचा फुटली, गुलामीच्या भिंती ढासळल्या आणि परिवर्तनाचा इतिहास घडवला.
डॉ. बाबासाहेबांनी केवळ धम्मचक्र फिरवले नसून संपूर्ण समाजाला आत्मसन्मानाची नवी दिशा दिली आणि कोट्यवधी लोकांच्या हृदयात बुद्धाच्या धम्मक्रांतीची ज्योत पेटवली. त्या महामानवाचे भंडारा जिल्ह्याच्या मातीला १९३६ साली पहिल्यांदा आणि १९५६ मध्ये दुसऱ्यांदा पदस्पर्श झाले, आणि भंडारा नगरी इतिहासात पावन झाली.
सात दशके उलटली, पण धम्मचक्राची गति आजही कायम आहे. विजयादशमीला जिल्ह्यातील लाखो अनुयायांच्या हृदयाचे ठोके वाढतात. दीक्षाभूमीच्या पवित्र मातीचा गंध तिच्या कपाळाला लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात वाढते. गावागावातून एसटी, सायकल, दुचाकी, मिळेल त्या साधनाने अनुयायांच्या झुंडी नागपूरच्या दीक्षाभूमीकडे आदल्या दिवशीच रवाना झाले.
सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात विजयादशमीला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, म्हणूनच हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी धम्मदीक्षा घेतली. त्या दिवशी दसरा असल्याचे अनुयायी सांगतात, त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसरा दोन्हीचे महत्व असून यावर्षी दसरा २० तारखेला आहे.
सिंधपूरी येथील बौद्ध स्तूप, सिल्लोतीतील मिनी दीक्षाभूमी, मैत्रेय बुद्ध विहार नाशिकनगर, लुंबिनी विहार बोरगाव पुनर्वसन, मानेगाव, झाबाडा, टेकेपार, बोधी पिंपळ विहार संगम, सद्धम्म विहार ठाणा, बिरसा मुंडा विहार, महाबोधी विहार मुरमाडी, लुंबिनी विहार बेला, त्रिरत्न विहार फुलमोगरा, प्रगतिशील विहार अशोकनगर, माता रमाई विहार, बुद्ध विहार शहापूर इत्यादी गाव खेड्यातील प्रत्येक विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, पंचशील धम्म ध्वज, धम्म मिरवणूक, धम्म उपदेश, भीम गीते आणि अभिवादन सभेचे आयोजन केले आहे.