भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : अदानी फाउंडेशनच्या वतीने तिरोडा परिसरातील १० गावांमध्ये महिलांसाठी विशेष नेत्र तपासणी शिबिर राबविण्यात आले. या शिबिरात तब्बल १,४११ महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १,०४२ महिलांना आवश्यकतेनुसार मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. अदानी पॉवर लि. तिरोडाचे स्टेशन हेड मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांच्या नेतृत्वात संबंधित ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. चिरेखनी, काचेवानी, गराडा, खैरबोडी, बेरडीपार, चिखली, गुमाधावाडा, कवलेवाडा, चुरडी आणि मेंदिपूर या गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे विशेषत: डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता यावे, डोळ्यांच्या समस्यांचे वेळेवर निदान व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे चष्मा घेणे शक्य नसलेल्या महिलांना मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन’ च्या तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांनी महिलांची नेत्र तपासणी केली. तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या १,०४२ महिलांना मोफत चष्मे देण्यात आले. चष्मा मिळाल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडावा, यासाठी अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून अशा आरोग्यविषयक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमाचे संबंधित गावांतील ग्रामस्थांनी खुप कौतुक केले.