अमृत भारत योजनेच्या दाव्यानंतरही तुमसर रोड स्थानकावर प्रवासी सुविधांचा अभाव

भंडारा पत्रिका/ वार्ताहर गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासन ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे दावे करत असले, तरी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ची अवस्था या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्लॅटफॉर्मवर पुरेशा प्रवासी शेडचा अभाव असल्याने प्रवाशांना भर पावसात तसेच उन्हात उभे राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवरून दररोज अनेक महत्त्वाच्या लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची ये-जा होते. यामध्ये बालाघाट-इतवारी लोकल, तिरोडी-इतवारी लोकल, दुर्ग-इतवारी लोकल, डोंगरगड-इतवारी लोकल, टाटा-इतवारी लोकल तसेच तुमसर रोड-तिरोडी डेमू गाडीचाही समावेश आहे.

याशिवाय मुख्य मार्गावरील सुपरफास्ट व एक्सप्रेस गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी अनेक गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर थांबवल्या जातात. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर गोंदिया बाजूस एकच प्रवासी शेड असून नागपूर बाजूस कोणतीही शेड उपलब्ध नाही. त्यामुळे गाडी नागपूरच्या दिशेने थांबल्यास प्रवाशांना उघड्या आकाशाखाली पाऊस, उन्हाचा तडाखा आणि इतर प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात वृद्ध, महिला, लहान मुले आणि रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पावसात भिजत गाडीची वाट पाहावी लागते, तर ओल्या आणि निसरड्या प्लॅटफॉर्ममुळे अपघाताचा धोका देखील वाढतो.

इतक्या महत्त्वाच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवरून धावत असतानाही मूलभूत प्रवासी सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज प्रवास करणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासन तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाºयांकडे मागणी केली आहे की, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या नागपूर बाजूस तातडीने प्रशस्त प्रवासी शेड उभारण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांनापाऊस व उन्हापासून संरक्षण मिळेल. स्थानिक नागरिकांनी इशारा दिला आहे की, ही समस्या तातडीने सोडविण्यात आली नाही तर रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *