गर्रा-बघेडा : रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी सुविधांबाबत मोठमोठे दावे केले जात असले, तरी तुमसर रोड रेल्वे स्थानकावरील वास्तव याच्या अगदी विपरीत असल्याचे दिसून येत आहे. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सध्या प्रवाशांसाठी एकही कार्यरत शौचालय उपलब्ध नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आधुनिक मॉड्युलर (क्लेटन) शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून इमारत वापरासाठी सज्ज आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अद्याप हे शौचालय प्रवाशांसाठी खुले केलेले नाही. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली ही सुविधा केवळ कुलूपबंद अवस्थेत पडून असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानकाच्या गोंदिया बाजूस असलेले जुने शौचालय दुरुस्ती व बांधकामाच्या कारणास्तव पूर्णपणे पाडण्यात आले. मात्र, ते हटविण्यापूर्वी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील शौचालयाची सुविधा पूर्णपणे बंद झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या केवळ प्रतीक्षागृहातील एकच शौचालय उपलब्ध आहे. हे शौचालय मुख्य प्लॅटफॉर्मपासून दूर असल्याने गाडी येण्याच्या वेळी प्रवाशांसमोर शौचालय वापरावे की ट्रेन पकडावी, असा प्रश्न निर्माण होतो. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. स्थानकावरील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रेल्वे प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटाच्या माध्यमातून महसूल गोळा करते, मात्र मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात गंभीर हलगर्जीपणा का केला जात आहे? नवीन शौचालय पूर्णपणे तयार असताना ते सुरू करण्यास एवढा विलंब का?” असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिक, नियमित रेल्वे प्रवासी आणि सामाजिक संघटनांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नागपूर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाºयांकडे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील नवीन शौचालय तात्काळ सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारची गैरसोय त्वरित दूर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.