भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व Entrepreneurship Development (InFED) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेल्या Incubation-cum-Business Facilitation Centre (IBFC), यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय Industry-Institute Round TÒble चे आयोजन करण्यात आले. उद्योग, शैक्षणिक संस्था आणि शासकीय विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून उद्योजकता विकास, स्टार्टअप प्रोत्साहन, स्वयंरोजगार व रोजगारनिर्मितीला चालना देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हांडधिकारी सावन कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. शिवाजी धवड, मुख्य कार्यकारी अधिकारी, IIM InFED, श्री. हेमंत बदर, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, श्रीमती सुनंदा बजाज, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी व विविध भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी डॉ. शिवाजी धवड यांनी IBFC भंडारा केंद्राची उद्दिष्टे, कार्यपद्धती व जिल्ह्यातील उद्योजकता परिसंस्था मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. तसेच IBFC च्या उद्दिष्टांची आणि भविष्यातील संधीची सविस्तर माहिती दिली.
आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सांगितले की, भंडारा जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या IBFC केंद्राच्या माध्यमातून स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) आवश्यक मार्गदर्शन, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगवाढीसाठी प्रभावी मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक असणारी कुशल मनुष्यबळाचा आराखडा उद्योग संघटना व औद्योगिक संस्थांच्या सहभागातून तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता, नवोपक्रमाची हात्ती आणि उद्योग सुरू करण्याची प्रेरणा विकसित करण्यासाठी महाविद्यालय्ये, उद्योग व प्रशासन यांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, भंडाराचे अध्यक्ष पंकज सारडा यांनी नवीन पिढीतील युवकांसाठी IIM Nagpur InFED मार्फत सुरू करण्यात आलेले IBFC केंद्र हे उद्योजकांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. लघु उद्योग भारती, भंडाराचे अध्यक्ष मुरारीलाल काबरा यांनी उद्योग क्षेत्रामोरील कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा मांडला. भंडारा जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे वळतात; मात्र स्थानिक उद्योगांमध्ये काम करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामुळे जिल्ह्यातच उद्योगाभिमुख व कुशल वर्कफोर्स निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर प्रतिसाद देताना सौ. सुनंदा बजाज, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी जिल्ह्यातील उद्योग संघटना, महाविद्यालये आणि संबंधित विभागांच्या सहभागातून जिल्हा कौशल्य विकास आराखडा (District Skill Development Plan) तयार करून अंतिम करण्यासाठी संयुक्त बैठका आयोजित करण्यात येतील, अशी माहिती दिली.
या प्रसंगी लघु उद्योग भारती, मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, भंडारा जिल्हा औद्योगिक सहकारी वसाहत तसेच जे. एम. पटेल महाविद्यालय, एम. आय. ई. टी. शाहपूर, मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, अनुराग फर्मसी महाविद्यालय, करंजेकर अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन संदूरवाफा, आठवले समाजकार्य महाविद्यालय, ऑसीसिस महाविद्यालय आणि मानसरामजी पाडोळे महाविद्यालय यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. तसेच REOLEFIN POLY PLAST PRIVATE LIMITED, RiceCity Garment Manufacturing Unit, PVR REPAIR JUNCTION, Sindpuri Farmer Producer Company, Ambagad Farmer Producer Company, Mariya Fashion (Lakhani) आणि Shantrakshit Enterprises, Bhandara यांच्यासोबत Agreement of Affiliation करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा नियोजन अधिकारी, कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), कृषि विज्ञान केंद्र, ATMA, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM), जिल्हा अग्रणी बँक आणि RSETI यांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास दिलीप दातीर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी, सौ. सुनंदा बजाज सहायक आयुक्त, कौशल्य विकास, हेमंत बदर महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सौ. यु. डी. चिखले आत्मा भंडारा, MSRLM चे प्रतिनिधी, MAVIM चे प्रतिनिधी, वति (NULM), जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, मंगल निमजे आरसेटी डायरेक्टर, पंकज सारडा अध्यक्ष मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, मुरारीलाल काबरा अध्यक्ष लघु उद्योग भारती, सुनील रंभळ अध्यक्ष भंडारा जिल्हा औद्योगिक सहकारी वसाहत, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योग प्रतिनिधी, उद्योजक व स्टार्टअप प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनू उके, सेंटर कोऑर्डिनेटर, IBFC यांनी केले.