उपवर्गीकरणाविरोधात आमदार एकवटले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आता अनुसूचित जातीतील आमदारही एकवटले आहेत. मंगळवारी उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला असून सभागृहातही सरकारला घेरण्याची तयारी आहे. सोमवारी अनुसूचित जातीतील आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन आपल्या भूमिकेची मांडणी केली. तसेच या आमदारांनी आपल्या सह्यांचे पत्र देऊन या निर्णयाला आपला ठाम विरोध असल्याचे ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बैठक घेण्याचे मान्य केले. या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, माजी मंत्री आ. राजकुमार बडोले, माजी मंत्री व चर्मकार समाजाचे नेते बबनराव घोलप आदी करणार आहेत.

मोर्चात सहभागी होण्यास महाराष्ट्रभरातून महिला,पुरूष रवाना झाले आहेत. या मोर्चात उपवर्गीकरणाला विरोध करणारे बहुतेक सर्व आमदार सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांना आमदारांनी एक निवेदन दिले. त्यावर महायुतीतील दोन मंत्र्यांसह २७ आमदारांनी स्वाक्षरी केली आहे. या प्रश्नावर ३० जूनला विरोधी पक्षांकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणि ६ जुलै रोजी अल्पकालिन चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर सभागृह गाजेल. जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचा आणि समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी आमदारांनी केला. तसेच, बिदर समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही करू नये, अशी मागणीही मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली. आता या विषयावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *