एसटी बसला चारचाकीची धडक; १४ प्रवासी थोडक्यात बचावले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बसस्थानकासमोर मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील चालक, वाहक व १४ प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावले असून दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर आगाराची बस (क्र. एमएच-४०वाई-५४९३) बालाघाटवरून गोंदिया-तिरोडा मार्गे तुमसरकडे जात होती. बस तिरोडा बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी वळत असताना बसस्थानकासमोरील सर्व्हिस रोडवरून भरधाव वेगाने येणाºया चारचाकी वाहनाने (क्र. एमएच-३६एआर-१५२४) बसला जोरदार धडक दिली.

या अपघातात बसचे चालक शैलेश ढोके, वाहक एन. राखडे तसेच बसमधील सर्व १४ प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून सुमारे २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चारचाकी वाहनाच्याही दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे काही काळ बसस्थानक परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. बस चालक शैलेश ढोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१ व ३२४ अन्वये तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण व चालकाच्या निष्काळजीपणाबाबत तिरोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *