
गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, गटार व नाली पाईपलाईनच्या कामांमुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते अक्षरश: खड्डयांच्या विळख्यात सापडले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या कामांच्या निकृष्ट दर्जाचे परिणाम समोर येऊ लागले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्याचीच अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता शहरातील महत्त्वाचा व दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, रुग्णवाहिका, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत या रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि उखडलेली डांबरी पृष्ठभाग यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याची स्थिती इतकी वाईट झाली आहे की, पावसाचे पाणी साचल्याने खड्डे कुठे आहेत हेही वाहनचालकांना सहज लक्षात येत नाही. परिणामी अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, ‘खासदारांच्या रुग्णालयासमोरील रस्ताच जर खड्डयांत गेला असेल, तर भंडारा शहराच्या विकासाच्या दाव्यांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?’, लोकप्रतिनिधी विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करतात, शहराच्या प्रगतीचे दावे करतात; मात्र प्रत्यक्षात शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि तेही एका खासदारांच्या रुग्णालयासमोरील रस्त्याची अशी बिकट अवस्था असेल, तर सर्वसामान्यांच्या भागातील परिस्थिती किती वाईट असेल याची कल्पना सहज येते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात सुरू असलेल्या गटार, नाली आणि पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामांमुळे अनेक रस्ते उखडून ठेवण्यात आले आहेत.
मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याकडे गंभीरपणे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले आहे, तर काही ठिकाणी खोल खड्डयांमध्ये पाणी साचल्याने रस्ते धोकादायक बनले आहेत. विशेषत: पावसाळ्यात या समस्येचे गांभीर्य अधिक वाढले असून, रोजच्या प्रवासात नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागत आहे. खासदारांच्या रुग्णालयासमोरील रस्ता हा केवळ एक सर्वसामान्य मार्ग नसून रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून गंभीर अवस्थेतील रुग्णांना रुग्णालयात आणले जाते, रुग्णवाहिका धावत असतात आणि आपत्कालीन सेवांसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मात्र अशा रस्त्यावर खड्डे, पाणी आणि चिखल साचल्याने रुग्णवाहिकांनाही अडथळे येत असल्याचे चित्र आहे. एखादा गंभीर रुग्ण वेळेत उपचारापर्यंत पोहोचू शकला नाही, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मते, शहरातील ही समस्या आता फक्त एका रस्त्यापुरती मर्यादित रा-ि
हलेली नाही. भंडारा शहरातील विविध चौक, मुख्य मार्ग आणि गल्लीबोळांमध्ये याच प्रकारची अवस्था निर्माण झाली आहे. गटार आणि पाईपलाईनच्या कामांसाठी रस्ते खोदले गेले; परंतु कामांचा दर्जा, नियोजन आणि त्यानंतरची दुरुस्ती या सर्वच बाबतीत गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील रस्ते हे दळणवळणाचे साधन कमी आणि अपघाताचे केंद्र अधिक बनत चालले आहेत, अशी टीका नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांनी खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनावरही रोष व्यक्त केला आहे.
‘स्वत:च्या रुग्णालयासमोरील रस्ता व्यवस्थित ठेवता येत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या समस्या कशा सोडवल्या जाणार?’ असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. फक्त निवडणुकीच्या काळात आश्वासने देणे आणि विकासाच्या घोषणा करणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता तपासून नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देणे हीच खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेषत: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक झाले आहे. मुख्य मार्ग, रुग्णालय परिसर, शाळा परिसर आणि वर्दळीच्या चौकांमधील खड्डे त्वरित बुजवून रस्ते पूर्ववत न केल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. अपघात, वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि रुग्णांच्या हालअपेष्टा या सर्व समस्यांचे केंद्रबिंदू बनलेल्या या रस्त्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी प्रशासनाला इशाराच दिला आहे की, जर वेळीच रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आगामी काळात तीव्र जनआंदोलन उभे राहू शकते. भंडारा शहरातील विकासकामांचा दर्जा, त्यावरील देखरेख आणि लोकप्रतिनिधींची भूमिका यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, खासदारांच्या रुग्णालयासमोरील रस्त्याची अवस्था ही संपूर्ण शहराच्या विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.