भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नांदेड : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हा परिषद, नांदेड येथील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याध्यक्ष मा. श्री. उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली श्री प्रशांत जामोदे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीचे आयोजन नांदेड जिल्हा महासंघाने अत्यंत नियोजनबद्ध व भव्य स्वरूपात केले. बैठकीच्या प्रारंभी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर मा. श्री. प्रशांत जामोदे (राज्य कार्याध्यक्ष तथा केंद्रीय उपाध्यक्ष), मा. श्री. संजय महाळणकर (राज्य सरचिटणीस), मा. श्री. कैलासनाना वाघचौरे (राज्य उपाध्यक्ष), मा. श्री. अतुल वर्मा (सल्लागार) तसेच सौ. कविता बोंद्रे (महिला उपाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातून श्री विलास खोब्रागडे ,सचिव,प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. तसेच कर्मचारी हिताच्या विविध प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. राज्य महासंघ व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघामार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. वार्षिक वर्गणी, जिल्हा महासंघ व प्रभाग संघटनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विविध प्रलंबित विषयांवर उपस्थित पदाधिकाºयांनी आपली मते मांडून संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत सर्व जिल्हा पदाधिकाºयांनी आपल्या जिल्ह्यातील संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा सादर केला.
कर्मचारी हितासाठी राज्यभर एकसंधपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी दिल्ली (फरीदाबाद) येथील महासंघाच्या कार्यालयात सांस्कृतिक व शिक्षण-प्रशिक्षण समितीचे केंद्रीय अध्यक्ष म्हणून स्वतंत्र जबाबदारी व सेन भवनात कक्ष प्राप्त झाल्याबद्दल राज्याध्यक्ष श्री. उमेशचंद्र चिलबुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्य कार्याध्यक्ष श्री. प्रशांत जामोदे, केंद्रीयकार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राज्य सरचिटणीस श्री. संजय महाळणकर, ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे नाशिक जिल्हा सरचिटणीस श्री. संजय गिरी तसेच नर्सेस संघटनेच्या कार्याध्यक्ष सौ. कविता बोंद्रे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
बैठकीच्या समारोपप्रसंगी राज्याध्यक्ष मा. श्री. उमेशचंद्र चिलबुले यांनी १२ डिसेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित भव्य महारॅलीसाठी महाराष्ट्रातून किमान ३,००० प्रतिनिधी उपस्थित राहतील, यासाठी प्रत्येक जिल्ह्याने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून संघटनात्मक तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन केले. शेवटी सर्व पदाधिकाºयांनी कर्मचारी हितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत,”कर्मचारी एकता झिंदाबाद!””महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा विजय असो!” अशा घोषणांनी सभेचा समारोप झाला. सभेचे आभार श्री गजानन शिंदे यांनी मानले सभेच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हा महासंघ चे अशोक कासराळीकर, व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.