भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : विकासाच्या गप्पा, भूमिपूजनांचे सोहळे आणि उद्घाटनांच्या फिती कापण्यात राजकीय नेते व्यस्त असताना लाखांदूर पंचायत समितीची वस्तुस्थिती मात्र अत्यंत विदारक आहे. तालुक्याच्या विकासाचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो, त्याच कार्यालयाचे छत पहिल्याच पावसात गळू लागले आहे. भिंती ओलाव्याने भिजत आहेत, महत्त्वाची कागदपत्रे ओली होत आहेत आणि अधिकारी-कर्मचाºयांना आजुबाजुला टेबल-खुर्ची ठेवून कामकाज करण्याची नामुष्की ओढवली आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, याचवेळी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सुसज्ज व अत्याधुनिक पंचायत समितीची नवी इमारत अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुलूपबंद पडून आहे. जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेली ही इमारत वापराअभावी धूळ खात पडली आहे, तरजुनी धोकादायक इमारत अजूनही नागरिकांच्या माथी मारली जात आहे.
नवी इमारत पूर्णत्वास आली, सर्व सुविधा उपलब्ध झाल्या, तरीही लोकार्पण होत नाही. यामागे नेमका अडथळा काय? प्रशासकीय उदासीनता, राजकीय श्रेयवाद की लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा? या प्रश्नाचे उत्तर देण्यास ना प्रशासन पुढे येत आहे, ना लोकप्रतिनिधी. दरम्यान, पावसामुळे जुन्या इमारतीत संगणक, महत्त्वाची शासकीय कागदपत्रे आणि कार्यालयीन साहित्य धोक्यात आले आहे. शेकडो नागरिक दररोज विविध कामांसाठी या कार्यालयात येत असतात. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी कोण स्वीकारणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
तालुक्यात लहानसहान विकासकामांच्या उद्घाटनासाठी मोठमोठे सोहळे आयोजित केले जातात. मात्र पंचायत समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय इमारतीचे उद्घाटन महिनोनमहिने रखडणे हे केवळ प्रशासकीय अपयश नसून जनतेशी केलेली प्रतारणा असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होतआहे. जनतेच्या पैशातून उभारलेली इमारत जनतेच्या सेवेसाठी खुली करण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? उद्घाटनाच्या तारखेवरच विकास अवलंबून आहे का? की श्रेयवादाच्या राजकारणात नागरिकांची गैरसोय मुद्दाम दुर्लक्षित केली जात आहे? असे संतप्त प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.