भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: जिल्हा नशामुक्त करण्याच्या उद्देशाने भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘जागर नशामुक्त अभियान २.०’ सुरू करण्यात आले आहे. “एकत्र या… नशामुक्त समाज घडवू या!” या ब्रीदवाक्याखाली समाजात जनजागृती निर्माण करणे आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापरावर प्रभावी नियंत्रण मिळवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महर्षी विद्यामंदिर, बेला (पोलीस स्टेशन जवाहरनगर) येथे सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी, जिल्हा परिषद गांधी विद्यालय, लाखनी (पोलीस स्टेशन लाखनी) येथे २०० ते २५० विद्यार्थी, तसेच जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा (पोलीस स्टेशन भंडारा) येथे २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे आरोग्य, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेकडो विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अंमली पदार्थांचे सेवन करणे, ते जवळ बाळगणे तसेच त्यांची खरेदीविक्री करणे हा कायद्याने गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा साठा याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी ती तातडीने पोलिसांना कळवावी. यासाठी पोलीस अधीक्षकांचा ८७९९८१८४१५ हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून, माहिती देणाºयाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.हे अभियान पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.