भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि विषारी समजल्या जाणाºया ‘बांबू पिट व्हायपर’ (हिरवा चापडा) या सापाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर टर्माईट हिल फ्रॉग आणि पेंटेड बलून फ्रॉग या दुर्मिळ उभयचर प्रजातीही संशोधकांना आढळल्या असून, या शोधामुळे भंडारा जिल्ह्याच्या जैवविविधतेत आणखी एका महत्त्वपूर्ण नोंदीची भर पडली आहे. ग्रीन नेचर फाउंडेशन (ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब), लाखनीच्या सर्पमित्र व सरीसृप संशोधकांनी आयोजित केलेल्या विशेष सरीसृप व जैवविविधता सर्वेक्षण मोहिमेदरम्यान हा दुर्मिळ शोध लागला. या मोहिमेत लाखनीचे सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, दर्वेश दिघोरे, आशिक नैतामे, भंडाºयाचे रजत घुगुसकर, नागपूरचे निसर्गसंशोधक सागर व्होरा, ओडिशाचे मत्स्य संशोधक हितेश नाईक, भूशास्त्र अभ्यासक तुषारकांत राणा, तामिळनाडूचे मत्स्य संशोधक साथरिया प्रभाकरन तसेच उमरेडचे सर्पमित्र जयेश भुसारी सहभागी झाले होते.
सायंकाळी रावणवाडी परिसरात रस्त्यालगत सर्वेक्षण सुरू असताना एका झाडाच्या फांदीवर पोपटी रंगाचा साप दिसून आला. जवळून निरीक्षण केल्यानंतर तो अत्यंत दुर्मिळ बांबू पिट व्हायपर (हिरवा चापडा) असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. विदर्भात या सापाच्या नोंदी अत्यंत कमी असून, भंडारा जिल्ह्यात यापूर्वी केवळ मृत अवस्थेत एक नमुना आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे हा जिवंत साप आढळणे संशोधकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. याच सर्वेक्षणादरम्यान टर्माईट हिल फ्रॉग, पेंटेड बलून फ्रॉग, ब्राँझ बॅक ट्री स्नेक (डोंगरवेल्या साप), चेकर्ड किलबॅक (पाणदिवड), विंचू, साळिंदर तसेच काही दुर्मिळ मत्स्य प्रजातींचीही नोंद करण्यात आली. या उल्लेखनीय शोधाबद्दल ग्रीन नेचर फाउंडेशनचे सर्पमित्र पंकज भिवगडे, मयूर गायधने, सलाम बेग, नितीन निर्वाण, गगन पाल, खेमराज हुमे, धनंजय कापगते तसेच संस्थेचे पदाधिकारी अशोक वैद्य, भैय्याजी बावनकुळे, अशोक नंदेश्वर यांनी संशोधकांच्या चमूचे अभिनंदन केले. या दुर्मिळ नोंदीवर आधारित संशोधन लेख लवकरच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित करण्याचा मानस संशोधकांनी व्यक्त केला आहे.