दुष्काळ जाहीर करण्याचे श्रेय शेतकऱ्यांचेच!

■ चरण वाघमारे यांचा दावा ■ तुमसर-मोहाडीचा समावेश झाला मात्र साकोली-लाखनीबाबत प्रश्न कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित होते. मात्र भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, साकोली आणि लाखनी या चार तालुक्यांचा त्यात समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने, धरणे आणि शासन निर्णयाची होळी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. या संघर्षातून शासनाने आता आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून त्यात तुमसर आणि मोहाडी तालुक्यांचा समावेश झाला आहे. या निर्णयाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनाच जाते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, तुडतुडे, मावा, खोडकिड्यांचा प्रादुर्भाव तसेच पाण्याची उपलब्धता असूनही पिकांवर झालेला परिणाम याची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. या संघर्षदरम्यान राजेंद्र सपटेट यांच्यासारख्या शेतकऱ्याला प्राण गमवावा लागल्याचेही वाघमारे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात साकोली आणि लाखनी तालुक्यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र नव्याने जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत या दोन्ही तालुक्यांचा समावेश न झाल्याने त्याबाबत शासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी वाघमारे यांनी केली.

धानाचे बोनस कधी मिळणार ?

दुष्काळग्रस्त तालुके घोषित करण्याबरोबरच धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या बोनसच्या प्रश्नावरही वाघमारे यांनी सरकारला घेरले. मुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केला असताना तो अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळ जाहीर करण्याचे श्रेय घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष मिळवून देण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र दुष्काळ जाहीर करण्याचे श्रेय पक्षाला मिळावे, असा कोणताही आग्रह नसल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *