मोठा बाजारातील स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाईची मागणी; भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचाचे निवेदन
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील ओमप्रकाश थानथराटे या स्वस्त धान्य दुकानदाराकडून शासकीय धान्याची काळ्या बाजारात विक्रीसाठी वापर होत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाने केला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंचाच्या वतीने जिल्हा अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, संबंधित स्वस्त धान्य दुकानदार शासकीय अन्नधान्य ग्राहकांकडून घेत असला, तरी लाभार्थ्यांना नियमानुसार धान्यवाटप केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय अन्नधान्याचा साठा जमा करून तो काळ्या बाजारात विकला जात असल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
शासनकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, या व्यवस्थेत गैरप्रकार होत असल्यास त्याचा थेट फटका पात्र लाभार्थ्यांना बसू शकतो. त्यामुळे संबंधित दुकानातील धान्यसाठा, वितरण नोंदी, लाभार्थ्यांना केलेले वाटप आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यांची तपासणी करण्याची मागणी मंचाने केली आहे. या प्रकरणात पुरवठा विभागाने प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित दुकानदार्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय धान्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे तालुकातध्यक्ष राहुल थोटे, शहराध्यक्ष सुरज पाठदिवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.