धरना आंदोलनानंतर जागे झाले प्रशासन जर्जर रस्त्याच्या सिमेंटीकरणाला सुरुवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक राजू सलाम पटेल यांनी नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या शांततापूर्ण आंदोलनानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने जर्जर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. मुस्लिम लायब्ररी चौक ते डॉ. पडोळे हॉस्पिटल मार्गे पोस्ट आॅफिस चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू करण्यात आले. या मार्गावरील रस्त्याची अवस्था अनेक दिवसांपासून अत्यंत खराब होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचत होते आणि वाहनचालकांसह पादचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दैनंदिन प्रवाशांना या रस्त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताची शक्यताही वाढली होती. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.

मात्र, तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून काम करण्यात आले आणि त्यानंतर दुरुस्ती रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. शुक्रवारी नगरसेवक राजू सलाम पटेल यांनी नागरिकांसह रस्त्यावर बसून शांततापूर्ण धरणे आंदोलन केले. खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनानंतर नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेत यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून सिमेंटीकरणाचे काम सुरू केले. या घटनेमुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळेत कारवाई झाली असती तर आंदोलनाची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *