तलाठी कार्यालयाजवळ आढळली ५०० ते ६०० अर्धवट जळालेली मतदार ओळखपत्रे

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : भंडारा जिल्ह्यातील डोंगरी बु. येथे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गावातील तलाठी कार्यालयाजवळील कचºयाच्या ढिगाºयात अंदाजे ५०० ते ६०० रंगीत मतदार ओळखपत्रे (एढकउ कार्ड) अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तलाठी कार्यालयाच्या परिसरातील कचºयाच्या ढिगाºयात मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्रे पडलेली दिसून आली. त्यापैकी अनेक ओळखपत्रे अर्धवट जळालेली होती, तर काही पूर्णपणे सुरक्षित अवस्थेतही आढळली. सुरुवातीला ही ओळखपत्रे मृत व्यक्तींची किंवा वापरात नसलेली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान त्यामध्ये आजही गावात वास्तव्यास असलेल्या काही जिवंत नागरिकांची मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. हा दावा अधिकृतरीत्या पडताळलेला नसला, तरी त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मतदार ओळखपत्र हे निवडणूक प्रक्रियेसाठी तसेच नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा शासकीय पुरावा मानला जातो. असे संवेदनशील दस्तऐवज कचºयाच्या ढिगाºयात आणि तेही अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळणे, ही बाब अनेक शंका उपस्थित करणारी आहे. ही ओळखपत्रे संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच फेकण्यात आली का? ती अधिकृत प्रक्रियेनुसार नष्ट केली जात होती का? किंवा संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, नवीन मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयाच्या फेºया माराव्या लागतात. अशा परिस्थितीत शेकडो मतदार ओळखपत्रे कचºयात सापडल्याने प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे संबंधित नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत महसूल प्रशासन किंवा निवडणूक विभागाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीत नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *