भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य सुविधा, शांत अभ्यासाचे वातावरण आणि आवश्यक संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिल्यास तेही यशाचे नवे शिखर गाठू शकतात, हे लाखांदूर नगरपंचायत वाचनालयातीलविद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२५ मध्ये नगरपंचायत वाचनालयाच्या अभ्यासिकेत नियमित अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, आतापर्यंत १० विद्यार्थ्यांची विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी निवड झाली आहे. नगरपंचायत वाचनालय हे गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. वाचनालयातील शांत व शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासिका तसेच उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला.
सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली जिद्द यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीमध्ये यश मिळविले. या विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 अंतर्गत नगरपंचायत वाचनालयात अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांची विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी निवड झाली आहे. यामध्ये रीना खुशाल वघारे, लाखांदूर (भंडारा जिल्हा परिषद), त्रिवेणी हरिजी लंजे, दांडेगाव (भंडारा जिल्हा परिषद), प्रतिभा मोदकराज रामटेके, लाखांदूर (पालघर जिल्हा परिषद), नेपाल तुळशीदास धोटे, डांभेविरली (गोंदिया जिल्हा परिषद), नितीन अशोक पारधी, लाखांदूर (रत्नागिरी जिल्हापरिषद), गंगा रामदासजी वैद्य, लाखांदूर (भंडारा जिल्हा परिषद), प्रणाली देवेंद्र डोंगरवार, मुरमाडी (भंडारा जिल्हा परिषद), ज्ञानेश्वर प्रेमचंद राऊत, मुंडीपार (बुलढाणा जिल्हा परिषद), आशिष रमेश गौरकर, लाखांदूर (रत्नागिरी जिल्हा परिषद), कांचन ताराचंद पिलारे, परसोडी (चंद्रपूर जिल्हा परिषद). या विद्यार्थ्यांच्या यशामुळे नगरपंचायत वाचनालयाच्या शैक्षणिक उपक्रमाला नवी ओळख मिळाली असून, परिसरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.