प्रतिनिधी दिघोरी मोठी : लाखांदुर तालुक्यातील कन्हाळगाव येथे बँक खात्यांचा कथित गैरवापर करून सायबर फसवणुकीशी संबंधित मोठ्या आर्थिक व्यवहारांचा गंभीर प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कन्हाळगाव येथील एका तरुणाने भंडारा पोलीस अधीक्षक तसेच सायबर पोलीस ठाण्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील दोनतरुणांनी विश्वास संपादन करून त्याचे बँक खाते वापरण्यास घेतले. त्यानंतर काही दिवसांतच संबंधित खात्यावर तब्बल २ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
या व्यवहारांची आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती तसेच त्यातून कोणताही आर्थिक लाभ मिळाला नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. प्रकरण समोर आल्यानंतर बँक खातेफ्रीझ करण्यात आल्याने त्याच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका व्यक्तीच्या बँक खात्यावर तब्बल ९६ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे दोन खात्यांमधीलसंशयित आर्थिक व्यवहारांची एकूण रक्कम २ कोटी ९६ लाख रुपयांवर पोहोचत आहे.
तक्रारीत संबंधित व्यक्तींनी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच कन्हाळगावातील आणखी काही युवकांची बँक खाती अशाच पद्धतीने वापरण्यात आली असण्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व बँक खात्यांवरील व्यवहार, मोबाईल क्रमांक, डिजिटल पुरावे, पैशांच्या व्यवहारांची साखळी आणि रकमेचा अंतिम प्रवाह यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. २ कोटी आणि ९६ लाख रुपयांचे व्यवहार नेमके कोणाच्या माध्यमातून, कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी झाले? या व्यवहारांमागे केवळ काही व्यक्तींचा सहभाग आहे की मोठे सायबर फसवणुकीचे जाळे कार्यरत आहे? याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे. तक्रारदाराने या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाºयांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे .