भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
तिरोडा : धानाला बोनस मिळावा, या मागणीसाठी शेतकरी सेवा समितीचे नरेंद्र रहांगडाले यांनी १५ सप्टेंबरपासून चंद्रभागा नाका, तिरोडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. गुरुवारी (१७ सप्टेंबर) उपोषणाचा तिसरा दिवस असून, तहसीलदार एन. एम. ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शासनाच्या स्तरावर निवेदन पाठवण्यात आले असून, उपोषण मागे घेण्याची सूचना त्यांनी केली. मात्र, बोनसबाबत शासनाचा निर्णय जाहीर होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका नरेंद्र रहांगडाले यांनी घेतल्याने आंदोलन सुरूच आहे. मंडपात काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी राधेशलालजी पटले यांच्या समक्ष तहसीलदारांनी शासनाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली.