भंडारा शहरात एमडीसह तिघांना अटक; २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा: शहरातील खात रोड परिसर पोलिसांन नाकाबंदी करून एमडी (मेथॅम्फेटामाइन) या अमली पदार्थाची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ३४ हजार रुपये किमतीची एमडी, दोन अँड्रॉइड मोबाईल आणि दोन मोटरसायकल असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना संत जगनाडे चौक, खात रोड येथे अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून सापळा रचला. यावेळी मोटरसायकलवरून संशयास्पद रीत्या येणाऱ्या दोन इसमाना अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडे एमडी अमली पदार्थ आढळून आला. कारवाई दरम्यान रमन गोविंदा ईश्वरकर (२५, रा. ओमनगर, खात रोड, भंडारा), अद्वैग पराग बोरकर (२०, रा. वैशाली नगर, खात रोड, भंडारा) आणि खैबर (२७, रा. खेता, ता. जि. भंडारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींकडून १.७०० ग्रॅम एमडी, अंदाजे ३४ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ, दोन अँड्रॉइड मोबाईल (किंमत १ लाख रुपये) आणि दोन मोटरसायकल (किंमत १ लाख २० हजार रुपये) असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एमडीबाबत आरोपी क्रमांक एकाची चौकशी केली असता त्याने हा अमली पदार्थ आरोपी क्रमांक तीनकडून विकत घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २०५३/२०२६, कलम ८(क), २२(अ) व २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लांडे, पोलीस हवालदार महाजन, एनडीपीएस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास भंडारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *