भरधाव ट्रक घुसला हॉटेलात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-तुमसर मार्गावरील बिरसी येथे आज शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अदानी प्रकल्पाकडे कोळसा घेऊन जाणारा २२ चाकी भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट माँ दुर्गा हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक तुमसरकडून अदानी प्रकल्पाकडे कोळसा घेऊन जात होता. बिरसी येथे आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. त्यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका महिलेने ट्रक अंगावर येत असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून तात्काळ बाहेर धाव घेतली. त्यामुळे ती थोडक्यात बचावली. अपघातामुळे हॉटेलचे फर्निचर, साहित्य व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल चालकाने दिली आहे. या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, तिरोडा-तुमसर मार्गावरील बिरसी येथे रस्त्याच्या कडेला नेहमीच जड वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका कायम असतो. याच ठिकाणी साकोली मार्गावरील बस थांबत असल्याने शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उभे असतात. सुदैवाने शाळेची वेळ संपल्यानंतर हा अपघात झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे जड वाहने उभी राहू नयेत, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *