मुख्यमंत्री पदासाठी आता कोणतीही वेकेन्सी नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना आता महायुतीतील दोन्ही मोठ्या पक्षांनी पूर्णविराम दिला आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, कुणीही घाई करू नये” असे ट्विट केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. गोंदिया येथे माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, “देवेंद्र फडणवीसजी आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकºयांसाठी, गोरगरिबांसाठी आणि विकासासाठी इतकं चांगलं काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री राहावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे.”

“वेकेन्सीच नाही, मग चर्चा कशाला?”

नेतृत्व बदलाच्या चर्चांवर थेट भाष्य करताना पटेल म्हणाले, आज ती वेकेन्सीच नाही आहे. मग त्याच्यावर चर्चा कोणी उगीचच काही विषय काढला आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी उत्तर देत बसायचं, हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री राहतील.”

बावनकुळे काय म्हणाले होते?

याआधी भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट केले होते. फडणवीसांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी म्हटले होते की, राज्यात विकासाची अनेक कामे सुरू आहेत आणि स्थिर सरकारमुळे ती पूर्णत्वाला जातील. त्यामुळे २०३४ पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्रीपदी राहतील.

राजकीय अर्थ काय?

मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चांना आता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे उत्तर दिले आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असून नेतृत्वाबाबत कोणताही मतभेद नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच आगामी निवडणुका लढवल्या जातील आणि राज्याचा विकासाचा अजेंडा पुढे नेला जाईल, हे या विधानांमधून स्पष्ट झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *