भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र जन्मदिवसाच्या निमित्ताने लाखनी ईद मिलाद- उन-नबी कमिटीच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण शहराची आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि इस्लामी झेंड्यांनी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते. ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने सुन्नी हनफी बरेली मशिदीतून भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील नागरिक, युवक तसेच मोठ्या संख्येने बालक सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जुलूस हाजी अहमद शाह यांच्या दर्ग्यापर्यंत पोहोचला. येथे कमिटीच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर जुलूस पुन्हा सुन्नी हनफी बरेली मशिदीत परतला. मशिदीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात बालकांनी हुजूर पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या शानमध्ये सुंदर नातियासादर केल्या. बालकांच्या या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. बालकांचा उत्साह वाढविण्यासाठी ईद मिलाद-उन-नबी कमिटीच्या वतीने त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी वक्तयांनी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जीवनातील प्रेम, दया, मानवता, बंधुभाव आणि शांततेच्या संदेशावर प्रकाश टाकला. समाजात परस्पर प्रेम, सद्भावना, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.