भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची अवधैरीत्या वाहतूक करणाऱ्या युवकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला तसेच दुचाकी असा एकूण ९४ हजार ८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालीद आबीद सय्यद (वय २९, रा. विवेकनगर, तुमसर) याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. यावेळी त्याच्या ताब्यातील विनानंबरच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडची किंमत सुमारे ८५ हजार रुपये असून, त्यामध्ये विविध कंपन्यांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात पान बहार, राजश्री, पान पराग प्रीमियम, विमल, इगल हुक्का शिशा तंबाखू, होला हुक्का शिशा तंबाखू, व्ही-१ तंबाखू, केपी डबल बर्तक तंबाखू आदी विविध प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा समावेश आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७४, २७५ व १२३ अन्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगवाणी, पोलीस हवालदार डोयले, बेदुरकर, पोलीस शिपाई साठवणे तसेच पथकाने केली.