३५ ग्रा.प.च्या प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह

कार्यभार, न्यायालयीन आदेश व आर्थिक व्यवहारांची माहिती मागितली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : भंडारा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये विस्तार अधिकारी-पंचायत, कृषी, शिक्षण व आरोग्य यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर तसेच ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सेवा महासंघ, तालुका भंडारा यांनी गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी), पंचायत समिती भंडारा यांच्याकडे निवेदन देऊन सविस्तर माहिती व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मागितल्या आहेत.

जिल्हा परिषद स्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी विस्तार अधिकारी यांची ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या १६ सप्टेंबरच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत जैसे थे स्थिती लागू करण्यात आली होती. २२ सप्टेंबरच्या सुनावणीत ही स्थिती ६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कायम ठेवण्यात आल्याचा दावा महासंघाने केला आहे.

संबंधित विस्तार अधिकाऱ्यांनी ३५ ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे काय, ताबा घेतला असल्यास कोणत्या तारखेला व किती वाजता घेतला, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कार्यभार हस्तांतरणावेळी तयार करण्यात आलेला चार्ज रिपोर्ट, पदभार प्रमाणपत्र अथवा ताबा पंचनाम्याच्या प्रमाणित प्रती मागण्यात आल्या आहेत.

प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतींचे आर्थिक व्यवहार, देयके, धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहार केले असल्यास त्यांचा दिनांक, रक्कम, खर्चाचे कारण आणि मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी आहे.

हे व्यवहार कोणत्या नियम, शासन निर्णय किंवा न्यायालयीन आदेशाच्या आधारावर करण्यात आले, याचीही स्पष्टता मागितली आली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत सर्व माहिती निर्धारित कालमर्यादेत देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाने निवेदनातून केली आहे.

 

न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले असताना ३५ ग्रामपंचायतींचा कार्यभार कोणत्या अधिकाराने बदलण्यात आला, हा गंभीर प्रश्न आहे. प्रशासकांनी केलेले आर्थिक व्यवहार, खर्च व मंजुरीची प्रक्रिया पारदर्शकपणे जाहीर करावी. संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देऊन न्यायालयीन आदेशाचे काटेकोर पालन करावे!

— बाबूलाल भोयर, तालुकाध्यक्ष, अशी सरंपच सेवा महासंघ, भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *