भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरातील गंज मार्केटजवळ उभी केलेली मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल होताच तिरोडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत चोरीचा छडा लावत आरोपीला मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनेचा तातडीने उलगडा झाला आहे. फिर्यादी अनिल देवदास मेहरचंदाने, रा. तिरोडा यांनी आपली मोटारसायकल गंज मार्केटजवळ उभी केली होती. २५ आॅगस्ट रोजी दुपारी २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी त्यांनी त्याच दिवशी रात्री सुमारे १० वाजता तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हादाखल केला.
पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून चोरीच्या मोटारसायकलीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत मेहंदीपूर येथील आशिष अशोक मेश्राम (वय २९) याला रात्री सुमारे २ वाजता ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपीसह चोरीची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, हवालदार सदाशिव निलंपत्रेवार, पोलीस शिपाई राहुल पेशने, शैलेंद्रकुमार पटले व अमित गायकवाड यांच्या पथकाने केली. पुढील तपास हवालदार निलंपत्रेवार करीत आहेत.