■ २ लाख ५५ हजार ६०३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
■ ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात, पथके रवाना
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
नागपूर/भंडारा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण ४४५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी मतदान पथके, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह आवश्यक प्रशासनिक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ४४ हजार ४६६ मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३२ हजार २६२, गोंदिया जिल्ह्यात २२ हजार १७६, वर्धा जिल्ह्यात २१ हजार ७४२, भंडारा जिल्ह्यात २१ हजार ३४९, तर गडचिरोली जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्रांच्या संख्येतही नागपूर जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यात २४६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५८, वर्धा जिल्ह्यात ४१, गोंदिया जिल्ह्यात ३९, भंडारा जिल्ह्यात ३५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २६ मतदान केंद्र आहेत.