साकोली पोलिसांच्या प्रभावी तपासाला यश
२० हजार रुपयांचा दंडही ठोठावला
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
साकोली : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी साकोली तालुक्यातील जमनापूर येथील आरोपी सहदेव धरमदास गडपायले (वय ३५ वर्ष) याला भंडारा येथील न्यायालयाने १० वर्षे काराவாसाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस २० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरण ये २०१९ मध्ये घडले होते. आरोपीने पीडितela लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशन साकोली येथे अपराध क्रमांक ३७६(२)(ठ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र रेवतकर, पोलीस स्टेशन साकोली यांनी केला. तपासादरम्यान उपलब्ध पुरावे, साक्षीतदारांचे जबाब तसेच प्रकरणाशी संबंधित बाबींची सखोल चौकशी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्याचे दत्तक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, पोलीस स्टेशन साकोली यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार धनराज रोहनकर, ब. नं. ७०१ यांनी प्रभावीपणे काम पाहिले. तसेच पीडितेच्या बाजूने सरकारी अभियोक्ता श्री. रमाकांत खत्री यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत पुरावे प्रभावीपणे सादर केले.
दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, भंडारा मा. श्रीमती भारती काळे यांच्या न्यायालयाने आरोपी सहदेव गडपायले याला दोषी ठरवून १० वर्षे कारावास व २० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
या निकालामुळे महिलांना लग्नाचे आमिष दाखवून किंवा खोटे आश्वासन देऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींना कायद्यापासून सुटका मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे. महिलाविरुद्ध होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत असून, अशा प्रकरणांमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येते, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे. तसेच, गुन्हा कितीही जुना असला तरी वैज्ञानिक, कायदेशीर आणि पुराव्यावर आधारित तपासाच्या माध्यमातून आरोपीला न्यायालयासमोर दोषी सिद्ध करण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील असते, याचे हे प्रकरण उदाहरण ठरले आहे. पीडित व्यक्तींनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन साकोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी केलेला तपास, पुराव्याचे संकलन, दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया तसेच न्यायालयीन कामकाजाचा सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे प्रकरणाला न्यायालयीन पातळीवर सकारात्मक निष्कर्ष मिळाला. साकोली पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आणि सरकारी अभियोक्तांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीला शिक्षा झाली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
साकोली पोलीस ठाण्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असून, महिलाविरुद्धचे लैंगिक अत्याचार, छेडछाड, फसवणूक अथवा इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे निदर्शनास आल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे