◆ मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
◆ एसआयआर मुळे अध्यापनावर परिणाम
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना दररोज दुपारी २ नंतर कार्यमुक्त करण्यात यावे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त जबाबदाऱ्या कमी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मुख्याध्यापक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
अतिरिक्त कामामुळे नियमित अध्यापन आणि शाळांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. शैक्षणिक सत्र २०१६-१७ नुकतेच सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एस आय आर मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले. शाळांमधील नियमित अध्यापन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन, मूल्यमापन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात विशेषतः खाजगी माध्यमिक शाळांतील बीएलओ नियुक्त शिक्षकांचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. या शिक्षकांना एसआयआर कामासाठी कोणतीही कार्यसूट अथवा वेळेची सवलत देण्यात आलेली नाही. मुख्याध्यापक संघाने शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बी एल ओ व बीएलओ मदतनीस म्हणून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करणे, एस आय आर चे काम पर्यायी शासकीय यंत्रणेमार्फत करून घेणे, खाजगी माध्यमिक शाळांतील बीएलओ शिक्षकांना दररोज दुपारी २ नंतर एसआयआर कामासाठी कार्यमुक्त करणे, याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आवश्यक निर्देश देणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत शिक्षकांना अध्यापनासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी मुख्याध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद धार्मिक, कार्यकारी सचिव बिपिनचंद्र रायपुरकर, सचिव राजू बांते, कार्यसदस्य अर्चना बावणे, राधेश्याम धोटे, सुनील घोल्लर, राजू भोयर यांनी केली आहे.