खाम तलाव प्रकल्पावर नगरसेविका ऋतुजा पडोळे यांचा प्रशासनाला जाब; मुदतवाढीच्या वैधतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नगरपरिषद भंडाराच्या आज (१७ जुलै) झालेल्या सर्वसाधारण सभेत अमृत योजनेअंतर्गत खाम तलाव पुनर्जीवन (सौंदर्यीकरण) प्रकल्पाच्या मुदतवाढीच्या विषयावर प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका ऋतुजा विवेक पडोळे यांनी प्रशासनाला धारेवर धरत गंभीर प्रश्न उपस्थित केले. सुमारे ९ कोटी ११ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश २०२४ मध्ये देण्यात आला होता. या कामासाठी केवळ २७० दिवस म्हणजेच ९ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती.

मात्र ती मुदत संपल्यानंतर जुलै २०२६ पर्यंत तब्बल १६ महिने उलटून गेले, तरी काम पूर्ण झालेले नाही. याहून गंभीर बाब म्हणजे, मूळ मुदत संपल्यानंतर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने मुदतवाढ दिल्याचा अधिकृत आदेश किंवा पुरावा उपलब्ध नसताना काम सुरू ठेवण्यात आले. मग नेमक्या कोणत्या आदेशाच्या किंवा कोणत्या कायदेशीर आधारावर हे काम सुरू ठेवण्यात आले? असा थेट सवाल नगरसेविका ऋतुजा पडोळे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच मूळ मुदत संपल्यानंतर १६ महिने कोणतीही अधिकृत मुदतवाढ नसल्याचा पुरावा असताना, आता पुन्हा सर्वसाधारण सभेत मुदतवाढ मंजुरीसाठी विषय आणण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी कामाची पूर्ण झालेली टक्केवारी, अभियंत्यांचा प्रगती अहवाल, साईट तपासणी अहवाल, विलंबास जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदार कोण, तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर सक्षम प्राधिकरणांच्या परवानग्यांची माहिती सभागृहासमोर सादर करण्याची मागणी केली. मात्र संबंधित शाखा अभियंत्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नगरसेविका पडोळे यांनी मुख्याधिकाºयांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. संबंधित अधिकाºयांवर कारवाई होऊन माफी मागितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. या आंदोलनादरम्यान नगरसेवक कमल साठवणे, नगरसेवक गजानन बादशाह आणि नगरसेवक विनोद चवरे हे त्यांच्या सोबत उपस्थित होते. अखेर मुख्याधिकाºयांनी प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित शाखा अभियंत्यांनी माफी मागितल्यानंतर नगरसेविका ऋतुजा पडोळे यांनी आंदोलन मागे घेतले. खाम तलाव प्रकल्पाच्या मुदतवाढीची प्रक्रिया, विलंबाची कारणे आणि प्रशासकीय जबाबदारी यावर आता शहरात मोठी चर्चा सुरू झाली असून या प्रकरणाची चौकशी काय निष्कर्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *