चिखली येथे दारूबंदीची अंमलबजावणी सुरू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिखली येथील ग्रामस्थांनी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठाम निर्णय घेतल्यानंतर तिरोडा पोलिसांनीही तातडीने कारवाई करत अवैध दारू गाळणाºयांच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत दारू गाळण्यासाठी ठेवलेले साहित्य, गुळाचे मिश्रण तसेच तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. चिखली गावात यापूर्वी सन २०१४ मध्ये दारूबंदी करण्यात आली होती. काही काळ गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाली. मात्र, कालांतराने पुन्हा अवैध दारू गाळून विक्री सुरू झाल्याने गावातील परिस्थिती गंभीर बनत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावातील काही नागरिक, युवक तसेच शाळकरी मुलेही व्यसनाच्या आहारी जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली होती. दारूच्या अतिसेवनामुळे काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे तसेच दारूमुळे गावात वादविवाद आणि कौटुंबिक कलह वाढल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर गावातील महिला व पुरुषांनी २७ आॅगस्ट रोजी सभा घेऊन चिखली गावात पुन्हा संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे निवेदन तिरोडा पोलीस स्टेशनसह संबंधित सर्व विभागांना देण्यात आले होते.त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सरपंच कैलासजी पटले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

या सभेत १ सप्टेंबरपासून गावात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावाच्या प्रती तिरोडा पोलीस स्टेशन तसेच संबंधित विभागांना देण्यात आल्या. यावेळी तिरोडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम यांना सरपंच कैलास पटले, उपसरपंच कपिल बावणे, पोलीस पाटील नीतू चुटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगरुजी पटले, दक्षता समितीच्या अध्यक्षा रेखाताई संजय पटले, उपाध्यक्षा गंगाबाई सोनवणे, सचिव संगीता हरीणखेडे, सहसचिव सारिका रंगारी, मार्गदर्शक रत्नदीप रंगारी, सहसरामजी पटले तसेच दारूबंदी समितीचे सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक दरड पाटील, हवालदार विनोद बिल्लोरे, शिपाई किसन डहारे तसेच महिला पोलीस कर्मचाºयांच्या पथकाने चिखली गाव परिसरातील अवैध दारू गाळण्याच्या अड्ड्यांवर छापेमारी केली.या कारवाईदरम्यान दारू गाळण्यासाठी ठेवलेले गुळाचे मिश्रण, दारू गाळण्याचे साहित्य व तयार दारू जप्त करण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *