भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : तुमसर रोड रेल्वे स्थानकावर अहमदाबादहावडा सुपरफास्ट एक्सप्रेसवर दगडफेक करून प्रवाशाला जखमी करणाºया २३ वर्षीय युवकाला रेल्वे सुरक्षा बल (फढऋ) ने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. ही कारवाई दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील आरपीएफ भंडारा पोस्ट व तुमसर रोड चौकीच्या पथकाने केली. घटना २७ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस तुमसर रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटत असताना अचानक एअर चेन पुलिंग (अउढ) झाल्याने गाडी काही वेळ थांबली. त्यानंतर इंजिनलगतच्या दिव्यांग डब्यावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या घटनेत आकाश गौतम (वय २३), रा. धरतीवाडा, ता. लालबर्रा, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) हा दिव्यांग प्रवासी किरकोळ जखमी झाला.
गोंदिया स्थानकावर त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आला. घटनेनंतर आरपीएफने तातडीने परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र आरोपीचा माग काढता आला नाही. याप्रकरणी भंडारा रोड पोस्ट अंतर्गत तुमसर रोड आरपीएफ चौकीमध्ये अपराध क्रमांक ८९६/२०२६ अन्वये रेल्वे अधिनियमाच्या कलम १५३ व १४१ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मंडल सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, आरपीएफ भंडारा पोस्ट प्रभारी एलिझाबेथ पवार व तुमसर रोड चौकी प्रभारी सतीश संपत ढोंके यांच्या नेतृत्वात तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. तपास अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक एस. के. गंगापारी यांनी नागपूर आरपीएफकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून त्याचे बारकाईने विश्लेषण केले.
सीसीटीव्हीमधील संशयिताचा फोटो जखमी प्रवाशाला दाखविल्यानंतर त्याने त्याची ओळख पटवली. त्यानंतर गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा ठावठिकाणा मिळाला. २९ जून रोजी आरपीएफच्या पथकाने रविदास नगर, तुमसर येथे छापा टाकून यश प्रकाश बर्वे (वय २३) याला ताब्यात घेतले. चौकशीत यश बर्वे याने गुन्ह्याची कबुली दिली. नागपूरहून तुमसर रोडपर्यंतच्या प्रवासादरम्यान दिव्यांग डब्यात सीटवरून त्याचा एका प्रवाश- ासोबत वाद झाला होता. तुमसर रोड स्थानकावर उतरल्यावर रागाच्या भरात गाडी सुटल्यानंतर त्याने त्या प्रवाशाच्या दिशेने दगड फेकल्याची कबुली त्याने दिली. यानंतर आरोपीला अटक करून त्याचा समावेश यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या अपराध क्रमांक ८९६/२०२६ मध्ये करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक एस. के. गंगापारी करीत आहेत. रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा बेकायदेशीर घटना आढळल्यास त्वरित आरपीएफला माहिती द्यावी. रेल्वे मालमत्ता किंवा प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.