भरधाव ट्रकची कारला मागून धडक: १३ वर्षीय बालिकेसह एकाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील विरली/बु. येथील बेदरे कुटुंबीयसह चंद्रपूरहून गणपतीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परत येत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरधा येथे एक अत्यंत भीषण आणि दुर्देवी अपघाताची घटना घडली. गणपतीचे दर्शन घेऊन कुटुंबाच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तेरा वर्षाच्या बालिकेसह एकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विरली बु. येथील हिमेश बेदरे हे आपल्या कुटुंबियसह शुक्रवारी रात्री चंद्रपूर वरून गणपती देखावे व दर्शन घेऊन ब्रह्मपुरीच्या दिशेने परत जात होते. नागभीड जळवील कोरधा येथे चालकाने कार रस्त्याच्या बाजूला उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेी मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने कारला अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.

या अपघातात कुमारी श्रावणी हिमेश बेदरे (वय १३) रा. विरली/बुज. ता. लाखांदूर आणि नितीन भर्रे (वय ३५) रा. बोंडेगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बेदरे आणि भर्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अपघातात हिमेश बेदरे, त्यांच्या पत्नी मेथला हिमेश बेदरे, मुलगा शौर्या बेदरे तसेच नितीन भर्रे यांच्या पत्नी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी मेथला हिमेश बेदरे यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून, हिमेश बेदरे व त्यांचा मुलगा शौर्या यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य राबविले, पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *