ग्रामवासियांमध्ये भीतीचे सावट,
मुख्य प्रवेशद्वारात लिंबू-मिरच्या, हळद-कुंकू व संशयास्पद पूजा; लसीकरणाच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने भीतीचे सावट, पोलिस तक्रारीची तयारी दोषींचा शोध घेण्याची मागणी
साकोली : साकोली तालुक्यातील झाडगाव ग्रामपंचायत परिसरात सोमवारी सकाळी कथित जादूटोणा अथवा भानामतीसदृश संशयास्पद प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वर्तुळाकार रचना, षटकोनी आकृती, कापलेले लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू, गुलाल आणि पेटविलेल्या अगरबत्त्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, याच दिवशी याच ठिकाणी बालके, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्य विभागाचा लसीकरण व आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेने ग्रामस्थांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला असून संपूर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता ग्रामपंचायतचे शिपाई संजय लांजेवार हे नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी आले असता मुख्य प्रवेशद्वारासमोर संशयास्पद स्वरूपाची पूजा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामपंचायतच्या अंगणात वर्तुळाकार रचना करून मध्यभागी षटकोनी आकृती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये कापलेले लिंबू, हिरव्या मिरच्या, हळद, कुंकू, गुलाल तसेच अगरबत्त्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने सरपंच, ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. हा प्रकार नेमका कोणी, कोणत्या हेतूने आणि कोणाला लक्ष्य करून केला, याबाबत गावभर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ग्रामपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्यामुळे संबंधित व्यक्ती गेटवरून आत प्रवेश करून हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्यक्षदर्शी माहिती व इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सरपंच भास्कर खंडाईत यांची प्रतिक्रिया
झाडगावचे सरपंच भास्कर खंडाईत यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत परिसरात अशा प्रकारे कथित भानामती अथवा जादूटोण्यासारखा प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करणार असून दोषी व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.”
यावेळी त्यांनी ग्रामपंचायत परिसरात यापूर्वीही अनेकदा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा आरोप केला. वृक्षांची रोपे उपटून फेकणे, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानातील पाइप फोडणे, बेशिन व शौचालयातील नळांची तोडफोड करणे, कचराकुंड्या जंगलात नेऊन फेकणे तसेच झाडगाव टोली आणि पापडा खुर्द येथे विजेची उपकरणे चोरी करून नेण्यासारख्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामविकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, याच ग्रामपंचायत परिसरात सोमवारी आरोग्य विभागाकडून बालके, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी आरोग्य अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनीही हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले. काही पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या कथित जादूटोणा प्रकरणामागील नेमके कारण, उद्देश आणि संबंधित व्यक्तीची ओळख पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, गावाच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.