साकोलीत एसटी बस-टँकरचा भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : लाखांदूर मार्गावरील माकोडे पेट्रोल पंपानंतरच्या धोकादायक वळणावर गुरूवारी सायंकाळच्या सुमारास साकोली आगाराच्या एसटी बस व टँकरची समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात बसमधील चालक, वाहक व प्रवाशांसह सात जण जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, साकोली आगाराची एमएच ०७ सी ९५४३ क्रमांकाची एसटी बस चालक शामराव आडू धनबांधे (वय ५६, रा. चिखली) व वाहक राकेश डडेमल (वय ४०, रा. गडकुंभली) यांच्या ताब्यात सायंकाळच्या सुमारास साकोली बसस्थानकातून नवेगावबांधकडे निघाली होती. बस लाखांदूर रोडवरील माकोडे पेट्रोल पंपाजवळील वळणावर पोहोचताच समोरून भरधाव येणाºया सीजी ०४ एनझेड २८०७ क्रमांकाच्या टँकरने बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बसमधील प्रवासी घाबरून गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र चालक, वाहक व प्रवाशांसह सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, साकोली येथे दाखल करण्यात आले.

काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा रेफर करण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत झ्र १) गुंजन संजय डुंभरे (वय १८, रा. सासरा), २) जयश्री हनुमंत केंद्रे (वय ३३, रा. सानगडी), ३) शामराव आडू धनबांधे (वय ५६, रा. चिखली झ्र चालक), ४) सत्यभामा देविदास रंगारी (वय ६५, रा. सानगडी), ५) नेहा गोटेफोडे (वय १२, रा. सासरा), ६) राकेश डडेमल (वय ४०, रा. गडकुंभली झ्र वाहक), ७) जयमाला राकेश लांडगे (वय ५०, रा. महागाव). अपघातामुळे लाखांदूर-साकोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविले तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर टँकरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *