‘नागपूर करार’ कुचकामी व अन्यायकारक असल्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आरोप; स्वतंत्र विदर्भाची जोरदार मागणी
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ‘नागपूर कराराची होळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर कराराची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. करारातील तरतुदींची अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भावर अन्याय होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही विदर्भाच्या विकासासंदर्भातील प्रश्न कायम असून, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हीच काळाची गरज असल्याचे यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी ‘स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी जोरदार पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
आंदोलननंतर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तसेच हे निवेदन पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात पूर्व विदर्भ उपाध्यक्ष मुकुश कुमार मेश्राम, तालुकाध्यक्ष भाऊराव बनसोड, कोअर कमिटी सदस्य भगवान झंजाड, माजी अध्यक्ष देविदास लांजेवार, उपाध्यक्ष कृष्णा गुन्हेवार, कृष्णा सपाटे, विष्णुदास बाबुराव लोणारे, मदन मनिराम बोडणे, अनिल उके, अरविंद रामटेके, शालिग्राम बोरकर, जीवन लांजेवार यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.