तिरोडा-बिरसी मार्गावरील लोधीटोला फाट्याजवळ दुर्घटना; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
तिरोडा : रस्त्यावर धोकादायककरीत्या नादुरूस्त अवस्थेत उभा असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिरोडा-बिरसी मार्गावर लोधीटोला मार्गाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृताचे नाव अजय गुलाब उपासे (वय ४२, रा. पांजरा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय उपासे हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच ३५ एम २१९७ ने झालिया येथून पांजरा येथे जात होते. दरम्यान, तिरोडा-बिरसी मार्गावरील लोधीटोला मार्गाजवळ रस्त्यावर ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ९२६७ हा नादुरूस्त अवस्थेत धोकादायककरीत्या उभा होता. अंधारात हा ट्रक लक्षात न आल्याने अजय उपासे यांच्या दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक झाली.
या अपघातात अजय उपासे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थलची मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थलची धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक डडस पाटील, हवालदार सुनील नामुर्ती व शिपाई मोहित चौधरी यांनी घटनास्थलची पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय, तिरोडा येथे पाठवण्यात आला. तसेच रस्त्यावर धोकादायककरीत्या उभा असलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला.
मृताचे भाऊ अतुल गुलाब उपासे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५, १०६ (१) तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम १३४ (अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक डडस पाटील करीत आहेत.
दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.