जेसीबी साहित्य चोरी प्रकरणी दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कोयलारी येथे घराशेजारी ठेवलेले जेसीबीचे साहित्य व डिझेल पंप चोरीला गेल्याच्या घटनेचा तिरोडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी दोन युवकांना अटक करून चोरीचे साहित्य तसेच ते वाहून नेण्यासाठी वापरलेले छोटा हत्ती वाहन असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोयलारी येथील लीलाधर ठाकरे यांच्या घराशेजारी ठेवलेले जेसीबीचे बूम, बूम सिलेंडर, बोनेट, बॅटरी बॉक्स व डिझेल पंप १६ आॅगस्ट रोजी रात्री ८ ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

याबाबत ठाकरे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे व पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान गावातील एका युवकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची माहिती उघड झाली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी दुसºया युवकाचा शोध घेतला. या कारवाईत अनमोल लोकचंद टेंभरे व रोहित सुभाष रहंगडाले यांना अटक करण्यात आली. चोरीचे साहित्य वाहून नेण्यासाठी वापरलेले छोटा हत्ती वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीस गेलेले ७२ हजार रुपयांचे साहित्य व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, हवालदार शिवानंद नीलपत्रेवार तसेच पोलीस शिपाई पटले, पेशने, गायकवाड, हर्षे, फुले व चालक पोलीस शिपाई टेंभुर्णीकर यांच्या पथकाने केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *