तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे आजारांना आमंत्रण : जिल्हाधिकारी मंदार पत्की

कोटपा कायद्याअंतर्गत शाळा परिसरातील तंबाखूजन्य विक्री दुकानांवर होणार कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोंदिया : राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे ‘स्वच्छ मुख अभियान’ मौखिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरणार असून मौखिक आरोग्य व मुख कर्करोगाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे आजारांना आमंत्रण देणे आहे, असे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समिती व सनियंत्रण समितीची सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्र दोंतुला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम कटरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखूजन्य अभियान राबविण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस इत्यादी ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नगर परिषद हद्दीतील अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व आरोग्य विभागाला दिले.

शाळा-महाविद्यालयांपासून १०० मीटर पर्यंत आढळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकानदारांवर कोटपा कायदा २००३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. आजही अनेक नागरिक गुटखा, खरा, तंबाखू, मावा, पानमसाला इत्यादीचे सेवन करीत असल्याने अशा प्रकारच्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील सेवन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत लोकांचे समुपदेशन करुन व्यसनाधीनतेपासून परावृत्त केले तर मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन मौखिक आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कोटपा कायदा २००३ अंतर्गत २०२३-२४ मध्ये १७९ लोकांवर दंडात्मक कारवाई करुन २४,३८०/- दंड वसूल करण्यात आला. २०२४-२५ मध्ये ४२० लोकांवर कारवाई करुन ७४,०२० /- दंड वसूल. २०२५-२६ मध्ये ६०४ लोकांवर कारवाई करुन १,०३,३७० /- दंड वसूल तर २०२६-२७ मध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत १४६ लोकांवर दंडात्मक कारवाई करुन २६,७५० /- दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी, ग्रामीण रुग्णालय देवरी व ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे तंबाखू मुक्ती समुपदेशन कक्ष तयार करण्यात आले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थेमध्ये मौखिक स्वच्छता, मौखिक आरोग्य व तंबाखू मुक्त मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखूचे व्यसन सोडणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.

तंबाखू मुक्त शाळा करण्याकरीता त्यांच्या स्तरावर चित्रकला किंवा रांगोळी स्पर्धा आयोजित करुन ३ उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करुन तंबाखू मुक्तीचे चिन्ह असलेले स्कूल बॅग वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे यांनी यावेळी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *