भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला, तरीही अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने भंडारा तालुक्यातील बळीराजा प्रचंड चिंतेत सापडला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता पाठोपाठ आलेली महत्त्वाची पावसाची नक्षत्रेही हुलकावणी देत असल्याने शेतशिवारातील आशा मावळू लागल्या आहेत. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर दिवसेंदिवस निराशेची छाया गडद होत असून, हिरवाईची आस धरलेली शेतजमीन पाण्याअभावी तडकू लागली आहे. दरवर्षी याच काळात संपूर्ण परिसरातील शिवार हिरव्या गालिच्याने नटलेले दिसते. भातशेतीत रोवणीची लगबग सुरू असते, शेतकºयांच्या बांधावर गजबज असते. मात्र, यंदा चित्र पूर्णपणे उलट आहे.
शेतात रोपे तयार असूनही पावसाअभावी अनेक शेतकरी रोवणी करू शकलेले नाहीत. कोरडवाहू जमिनीवर पेरणी कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाच्या प्रत्येक सरीची वाट पाहत दिवस पुढे सरकत आहेत; मात्र ढग येतात आणि पाऊस न पडताच निघून जातात. ज्या शेतकºयांकडे विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून सिंचनाची काहीशी सोय आहे, त्यांनी मोठे आर्थिक धाडस करत रोवणीची सुरुवात केली. परंतु भूजल पातळीत वाढ न झाल्याने विहिरी आणि बोअरवेलचे पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे आता सिंचनावर उभे असलेले धानपीकही संकटात आले असून, शेतकºयांची चिंता अधिक वाढली आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात सक्रिय होणारा मान्सून यंदा अपेक्षेप्रमाणे बरसलाच नाही. जुलैचा मध्य जवळ येत असतानाही अनेक भागांत समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. हवामान खात्याचे अंदाज आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने शेतकºयांचा अंदाजांवरील विश्वासही डळमळीत होत आहे.
पावसाने अशीच पाठ फिरवली तर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. बियाणे, खत, मशागत आणि मजुरीवर आधीच मोठा खर्च केलेल्या शेतकºयांना पुन्हा पेरणी करावी लागल्यास त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. अनेकांनी शेतीसाठी कर्ज घेतले असून, उत्पन्नाची सर्व आशा पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस शेतकºयांसाठी अधिक वेदनादायी ठरत आहे. केवळ शेतीच नव्हे, तर जनावरांसाठी चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही या परिस्थितीचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. तलाव, ओढे आणि लहान जलसाठे अद्यापही पुरेसे भरले नसल्याने आगामी दिवसांबाबतची चिंता अधिक गडद झाली आहे. सध्या संपूर्ण तालुक्यातील बळीराजा एकाच आशेवर जगत आहे, आभाळ भरून यावे आणि मुसळधार पावसाने शिवार पुन्हा हिरवेगार व्हावे. मात्र, पावसाचा हा दीर्घ खंड कायम राहिला तर यंदाचे खरीप हंगामासह ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना आणि मदतीचा आराखडा तातडीने तयार करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.